जळगाव – शाळेच्या बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये आज सकाळी घडली आहे. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 30 विद्यार्थी आणि शिक्षक होते. या अपघातात काही विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत.
शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी ही बस शाळेकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी बसमधील विद्यार्थी, शिक्षकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या अपघातानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणाची नोंद घेण्यात आली.
या अपघातानंतर पालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्कूल बसचा अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यासाठी स्कूल बसच्या देखभालीबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.