पुणे : करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यात इयत्ता पाचवी व आठवीसाठी 23 मे रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी मध्ये घेण्यात येते. यंदा करोनामुळे ही परीक्षा 25 एप्रिल रोजी घेण्याचे आधी निश्चित करण्यात आले. मात्र नंतर परीक्षा पुढे ढकलत 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता परीक्षा आणखी लांबणीवर टाकण्याचा निर्णय सोमवारी ( दि.10) घेण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील 47 हजार 612 शाळांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेसाठी एकूण 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या परीक्षेसाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यातील दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर शिष्यवृत्तीची परीक्षाही रद्द होण्याबाबत चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठविले होते. परिस्थिती प्रतिकूल असेल तर परीक्षा रद्द करण्याऐवजी काही काळासाठी परीक्षा पुढे ढकलणे उचित ठरणार आहे तरी याबाबत पुढील आदेश देण्यात यावेत असे शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. दरम्यान शासनाकडून परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या सूचना परीक्षा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेच्या आयोजनाची तयारी सुरु करण्यात आली होती. प्रश्नपत्रिका छपाई सुरू करण्यात आली होती.15 मे पर्यंत सर्व जिल्हा केंद्रावर परीक्षेचे साहित्य पोचवण्याचे नियोजन होते. शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने व करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे 23 मे रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अन्यथा या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह इतर काही संघटनानी राज्य शासनाला दिला होता. अखेर सर्व बाबींचा विचार करत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिष्यवृत्ती परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येणार आहे, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जारी केले आहे.