पुणे – चालू वर्षात म्हणजे 2020 मध्ये करदात्यांनी करायच्या विविध व्यवहारांचे वेळापत्रक प्राप्तिकर विभागाने जाहीर केले आहे. यामुळे करदात्यांना विविध तारखा आठवणीत राहतील. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळेल, अशी आशा कर विभागाने प्राप्तीकरदात्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये केली आहे.
प्राप्तिकरदात्यांना पाठविलेल्या सर्वसाधारण ई-मेलमधील माहितीनुसार, यामध्ये करदात्यांसाठी कॅलेंडर पाठवण्यात आले आहे. यामध्ये प्राप्तिकर विभाग कोणकोणत्या सेवा उपलब्ध करतो, याचीही माहिती देण्यात आली आहे. या वेळापत्रकात 31 डिसेंबर 2019 रोजी संपलेल्या तिमाही साठीच्या टीसीएस आणि टीडीएस भरण्याच्या जानेवारीतील अंतिम तारखा देण्यात आलेल्या आहेत.
2020-21 साठी आगाऊ कर भरण्याचा शेवटचा आणि चौथा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 मार्च असल्याचे सांगण्यात आले आहे. 2019-20 या वर्षासाठीचे प्राप्तिकर विवरण याअगोदर भरलेले नसल्यास विलंब शुल्कासह ते भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. 2019-20 आर्थिक वर्षासाठीच्या चौथ्या तिमाहीचे टीसीएस स्टेटमेंट सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे आहे.
पूर्वीच्या तिमाहीसाठी भरलेल्या टीडीएसचे तिमाही स्टेटमेंट सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याचा पहिला हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 जून आहे.
बहुतांश व्यक्तीसाठी 31 जुलै ही प्राप्तिकर विवरण सादर करण्याची शेवटची तारीख आहे. कंपन्या आणि आणि ज्यांचे खाते ऑडिट केले जाते अशासाठी प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आगाऊ करण्याचा तिसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर आहे.