Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुळे यांनी याप्रकरणी CBI, ED आणि विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई आणि योजनेचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल ४,८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. योजनेत १४,२९८ पुरुषांना लाभ मिळाला, ज्यामुळे २१.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय, अपात्र महिलांना आणि एकाच कुटुंबातील अनेक अर्जदारांना लाभ देऊन एकूण १,६४० कोटींचे नुकसान झाले आहे. या रकमेचे ‘राऊंड ट्रिपिंग’ झाले आहे का? कष्टकरी महिलांचे पैसे कोणाला दिले गेले? याची उत्तरे सरकारने द्यावीत.” सुळे यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “योजनेसाठी एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीला जबाबदारी देण्यात आली. या कंपनीने पुरुषांचे अर्ज कसे पात्र ठरवले? यामागील जबाबदार कोण? याची चौकशी CBI आणि ED ने करावी. योजनेचे पूर्ण ऑडिट झाले पाहिजे आणि ज्याची अंतिम सही आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे.”