नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने दुसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला आहे. यानुसार या बँकेला पहिल्या तिमाही झालेला नफा 10 टक्क्यांनी वाढून 20,160 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या बँकेला केवळ 18,331 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत कंपनीचे व्याजातील उत्पन्न वाढून 1,19,654 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी हे रक्कम 1,13,871 कोटी रुपये होती. या तिमाहीत बँकेचे अनुत्पादक मालमत्ता विषयक परिस्थिती सुधारली आहे. बँकेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 1.73% झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 2.13% होते. या तिमाहीत निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.42% इतकी आहे, जी की गेल्या वर्षी या तिमाहीत 0.53% होती. बँकेची अनुत्पादक मालमत्ता कमी झाल्यामुळे बँकेला खराब कर्जापोटी कमी तरतूद करावी लागली आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते.