नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मचे अपग्रेडेड व्हर्जन ‘YONO 2.0’ लाँच केले आहे. या अद्ययावत प्लॅटफॉर्मद्वारे बँकेच्या ५० कोटींहून अधिक ग्राहकांना डिजिटल सेवा पुरवण्याचे लक्ष्य आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी एसबीआयने योनो ॲप बाजारात आणले होते. सध्या ९.६० कोटी ग्राहक योनोचा वापर करत असून, ही संख्या लवकरच वाढवून २० कोटींपर्यंत नेण्याचा बँकेचा मानस आहे. योनो हे एसबीआयसाठी नवीन ग्राहक जोडण्याचे आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) देण्याचे एक प्रमुख माध्यम बनले आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने नवीन बचत खाती उघडली जात आहेत. योनो 2.0 हे खास करून भारतीय बाजारपेठेसाठी डिझाइन केलेले एक सोपे ॲप आहे. याची खासियत अशी आहे की ते वापरण्यासाठी महागड्या स्मार्टफोनची गरज नाही. तसेच, ज्या भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमकुवत आहे, तिथेही हे ॲप सुरळीतपणे काम करते. योनो 2.0 च्या मदतीने ग्राहक आपले आर्थिक व्यवहार सहजपणे व्यवस्थापित करू शकतात, तसेच फंड ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि यूपीआय (UPI) व्यवहार करणे शक्य होते. एसबीआयने या नवीन व्हर्जनमध्ये मोबाइल ॲप आणि इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मला एकत्र केले आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ॲपमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जसे की ट्रान्झॅक्शन कंट्रोल आणि ओटीपी (OTP) प्रक्रियेला अधिक मजबूत बनवण्यात आले आहे. योनो 2.0 मुळे केवायसी (KYC) आणि री-केवायसी (Re-KYC) प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे, ज्यामुळे अनेक उत्पादने आणि सेवांसाठी वारंवार पडताळणी करण्याची गरज भासत नाही. सध्या हे ॲप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, पण लवकरच ते १५ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची बँकेची योजना आहे. यामुळे देशभरातील एसबीआयच्या ग्राहकांना ॲप वापरणे अधिक सोपे होईल. याशिवाय, ॲपमध्ये खर्च विश्लेषण (Spending Analysis), स्मार्ट शिफारशी (Smart Recommendations) आणि क्रेडिट स्कोअर सिम्युलेटर यासारखी आर्थिक व्यवस्थापन साधनेही देण्यात आली आहेत. ही साधने वापरून ग्राहक आपल्या क्रेडिट हेल्थवर लक्ष ठेवू शकतात आणि ती सुधारू शकतात.