Banking News : SBI च्या सर्व खातेदारांसाठी महत्वाची बातमी! डेटा लीकबाबत बँकेचा मोठा खुलासा; ‘पैसे सुरक्षित’
Banking News : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) डेटा लीकच्या घटनेवर स्पष्टीकरण दिले असून मोजक्याच ग्राहकांवर परिणाम झाला आहे आणि सर्व खात्यांमधील पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.

Banking News : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नुकत्याच समोर आलेल्या सायबर डेटा लीकच्या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
सायबर सुरक्षेशी संबंधित या घटनेमुळे बँक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र बँकेने निवेदन (बुधवार, दि. 21 ऑक्टोबर) जारी करून सर्व खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर घटनेचा परिणाम अत्यंत मोजक्या ग्राहकांवर झाला आहे. बँकेची मुख्य आयटी यंत्रणा, दैनंदिन व्यावसायिक कामकाज, आर्थिक कामगिरी आणि सेवा यांच्यावर या घटनेचा कोणताही विपरित परिणाम झालेला नाही.
सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या खात्यात जमा असलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे.

ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक व कायदेशीर पावले उचलली जात आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्या डेटाची गोपनीयता हीच बँकेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्टेट बँकेने अधोरेखित केले आहे.
SBI डेटा लीक प्रकरण काय आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर आल्याचे प्रकरण समोर आले आहे. १६ ऑक्टोबरला थ्रेट इंटेलिजन्स सेवा पुरवठादार, डिफेन्स सायबर एजन्सी आणि CERT-In कडून SBI ला याची माहिती मिळाली. सुमारे ३.७५ लाख रेकॉर्डची प्राथमिक तपासणी केली असता ३,८९७ ग्राहकांचे वैयक्तिक तपशील आढळले अससल्याचे नमूद करण्यात आल्या वृत्त आहे.
यात नाव, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता, शाखा, CIF क्रमांक आणि कर्जाशी संबंधित माहितीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेटा नेमका कुठून लीक झाला आणि त्याची संपूर्ण व्याप्ती किती आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. SBI ने स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेमार्फत तपास सुरू केला आहे.
डिस्क्लेमर: बँक कधीही फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुमचा ओटीपी (OTP), पासवर्ड, एटीएम पिन किंवा सीव्हीव्ही क्रमांक मागत नाही. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी व्यक्तीशी गोपनीय माहिती शेअर करू नका.





