प्रभात वृत्तसेवा पुणे – झाडे ही आईसारखी असतात. त्यांच्या अस्तित्वानेच आपल्या आयुष्याला आधार मिळतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे झाडे मुलांच्या मनात लावली पाहिजेत; तेव्हाच संवर्धन ही आयुष्यभराची मूल्ये बनतील, असे मत प्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.पुणे जिल्हा परिषद व सह्याद्री देवराई फाउंडेशनतर्फे जिल्ह्यात चला सावली पेरू या ही जिल्हास्तरीय वृक्षलागवड मोहीम सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झेडपीचे सीईओ गजानन पाटीलसह आदी उपस्थित होते.या उपक्रमांतर्गत देवराई फाउंडेशन प्रत्येक सहभागी शाळेला स्थानिक वृक्षांच्या बिया, प्लास्टिक ग्रो बॅग्स आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थी स्वतः बियांची लागवड करून एक वर्ष जोपासना करतील आणि तयार रोपे शाळांकडे जमा करतील. त्यानंतर ही रोपे शाळांमध्ये व परिसरात लावली जाणार आहेत. तसेच, प्रत्येक शाळा स्थानिक बियाणे गोळा करून झाडे, वनस्पती व जैवविविधतेची नोंद ठेवणारे बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणार असून यामुळे विद्यार्थ्यांचा स्थानिक परिसंस्थेशी परिचय अधिक दृढ होणार आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, हा उपक्रम पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पातील महत्त्वाच्या परिवर्तनात्मक उपक्रमांपैकी एक आहे. ग्रीन स्कूल हे आमचे प्रमुख लक्ष्य असून या मोहिमेत सर्व शाळांना सामावून घेऊ. जास्तीत जास्त रोपे विद्यार्थ्यांकडून परत मिळतील यासाठी योग्य आखणी केली जाईल. तसेच या सहकार्याला औपचारिक स्वरूप देण्यासाठी जिल्हा परिषद व सह्याद्री देवराई फाउंडेशनमध्ये लवकरच सामंजस्य करार होणार आहे.