nagar | पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या सावंत याचा निषेध

जामखेड, (प्रतिनिधी) – पत्रकार पागल झाले आहेत, पत्रकारिता करणे म्हणजे वेश्या व्यवसाय करणे, अशा प्रकारची बदनामीकारक पोस्ट टाकून पत्रकार बंधूंचा अपमान केल्याच्या निषेधार्थ खर्डा प्रेस क्लबच्या पत्रकारांनी अण्णा सावंत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची मागणी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. 8 एप्रिल रोजी खर्डा येथे कपिलेश्वर मंदिराजवळ श्री 108 श्रीमंतयोगी बालयोगी ब्रह्मऋषी महात्यागी अवधूतचिंतन सद्गुरु संन्यासी पागल बाबा यांनी व्यसनमुक्ती व समस्या निवारणासाठी आश्रमाची स्थापना केली आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांचा ओघ वाढत चालला आहे.
खर्डा परिसर व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून खर्डा येथे श्रीराम मंदिर उभारण्यात येणार आहे, त्यासंबंधीची बातमी न्यूज पोर्टलवर प्रकाशित केली. जामखेड येथील ग्रुपवर तालुक्यातील पत्रकार व इतर काही मंडळी आहे.
या ग्रुपवर बातमी प्रकाशित होताच जामखेड येथे राहणारा अण्णा सावंत याने सदरची बातमी ग्रुपवर हटविण्यास सांगून पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले. अण्णा सावंतची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी खर्डा प्रेस क्लबच्या पत्रकारांनी खर्डा पोलीस स्टेशनकडे केली.
यावेळी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात, पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, किशोर दुशी, अनिल धोत्रे, धनसिंग साळुंके, शेखर देशमुख, सुनील साळुंके, गणेश सूळ उपस्थित होते.





