प्रभात वृत्तसेवा पुणे – अब तो बडी बेर भयी, हा शांत, करुणामय असा भीमपलास आणि जा जा रे अपने मंदिरवा, या द्रुत बंदिश सादरीकरणाने सवाई गंधर्व महोत्सवाच्या सत्राला शनिवारी सुरवात झाली. बंगळूरु येथील युवा गायक सिद्धार्थ बेलमन्नू यांच्या गायनाने महोत्सवात रंगत आली. गुरू पंडीत विनायक तोरवी यांच्याकडून त्यांना किराणा, ग्वाल्हेर घराण्याचे मार्गदर्शन लाभले आहे. विलंबित एकतालातील अब तो बडी बेर भयी या रचनेनंतर रागविस्तार करताना सरगमचा सौंदर्यपूर्ण वापर हेही त्यांचे वैशिष्ट्य ठरले. बीरज में धूम मचाए शाम या बंदिशीतून भीमपलासचा एक वेगळा रंग श्रोत्यांसमोर त्यांनी आणला. पाठोपाठ जा जा रे अपने मंदिरवा ही द्रुत बंदिश सादर केली. पंडीत भीमसेनजींनी लोकप्रिय केलेला माझे माहेर पंढरी हा अभंग आणि संत राघवेंद्र स्वामी यांची कन्नड भक्तीरचना सादर करून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम), माऊली टाकळकर (टाळ), वैशाली कुबेर, अनुजा भावे -क्षीरसागर यांनी तानपुरा साथ केली. त्यानंतर भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी मुलतानी रागाने सादरीकरणाला सुरुवात केली. विलंबित एकतालातील कैसे कर मन समझाऊ ही डाॅ. चैतन्य कुंटे यांची रचना, त्याला जोडून डाॅ. अरविंद थत्ते यांनी बांधलेला तराणा सादर केली. हा तराणा वैशिष्ट्यपूर्ण होता. पाठोपाठ आचार्य रातंजनकर यांची त्रितालातील ‘नैना नीर झरन’ ही बंदिश अनुराधा यांनी सादर केली. प्रतापवराळी या दाक्षिणात्य रागातील बरन साजन सखी ही उस्ताद अमान अली खाॅ यांची त्रितालातील रचना सादर करून समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सौमित्र क्षीरसागर (हार्मोनिअम), ओवी तेंडुलकर आणि मृद्गंधा कड (तानपुरा) यांनी साथ केली. सवाईची चढती रंगत अधिक खुलवण्यासाठी प्रसिद्ध बासरीवादक पंडीत रूपक कुलकर्णी स्वरमंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांनी राग शुद्ध कल्याण सादर केला. मोजक्या स्वरांतून रागरूप यथार्थपणे दर्शवत त्यांनी मांडणी केली. ईशान घोष यांची तबलासाथ सुरू होताच लयकारीचे वैविध्य उलगडत गेले. ११ मात्रांच्या तालातील काहीसे अनवट वादनही त्यातील माधुर्य जपल्याने रसिकांची भरभरून दाद मिळवून गेले. पाठोपाठ द्रुत त्रितालातील रचनेतून पं. रूपक कुलकर्णी यांनी ईशान घोष यांच्यासह लयीच्या नानाविध स्वराकृती साकारल्या. त्यांना जयकिशन हिंगु यांनी बासरीची साथ केली.