Satara: सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य क्रांतिकारी

सातारा- अंधकाराच्या व ज्ञानाच्या बेडी तोडून स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे क्रांतिकारी कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी केले असे प्रतिपादन एडवोकेट नीलिमा कदम यांनी केले.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड होते.
अॅड. नीलम कदम म्हणाल्या व्यवस्थेने हजारो वर्ष शिक्षण स्त्रियांना नाकारले, त्यांच्या हक्कासाठी क्रांती अग्रणी महात्मा फुले व आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी अथक संघर्ष केला. स्त्री वर्गाच्या अवनतीचे कारण अज्ञानात आहे हे ओळखून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. दीडशे वर्षापूर्वी महिला शिक्षणासाठी शाळा सुरू करणे एक कठीण काम होते पण व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली. मुलींसाठी शाळा सुरू करणे ही घटना त्याकाळी महाराष्ट्रातील व देशातील क्रांतिकारी कृती होती.
महिलांना जो आत्मसन्मान आहे तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे आहेत. विद्यार्थी वर्गाने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या संघर्षमय कामाचा आदर्श अभ्यासला पाहिजे, असे आवाहन प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी केले
यावेळी प्रणाली कामगार, दिपाली भिसे, अस्तिका आगाशे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सुवर्णा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती बोटे यांनी आभार मांडले. प्रा.का अर्चना पवार यांनी सूत्रसंचालन केले.





