Pune District : शिष्यवृत्ती परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचा डंका!
Pune District : या परीक्षेत साईराज सुभाष पडवळ, सुयश बाळासाहेब इचके आणि कृष्णा राहुल मिंडे यांनी प्रत्येकी २६२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तर शिवन्या राहुल नरवडे हिने २५२ गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

शिरूर : सविंदणे, ता. शिरूर : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. चार विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे सविंदणे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा जिल्हास्तरावर दखल घेतली गेली आहे.
या परीक्षेत साईराज सुभाष पडवळ, सुयश बाळासाहेब इचके आणि कृष्णा राहुल मिंडे यांनी प्रत्येकी २६२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तर शिवन्या राहुल नरवडे हिने २५२ गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक लहू मनाजी शितोळे, वर्गशिक्षक अशोक गोरख फसले आणि सहशिक्षक गणेश बाळू पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या या यशामुळे सविंदणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रितम कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे, केंद्रप्रमुख बाळासाहेब आसवले तसेच शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





