शेतकऱ्यांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करा; पद्माकांत कुदळे यांची तहसीलदारांकडे मागणी

कोपरगाव -आस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास त्यांना शासनाकडून वेळोवेळी मदत दिली जाते. मदत करताना प्रत्येक वेळी कागदपत्रे जमा करण्यास सांगितली जातात. वारंवार तीच कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होते. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करून शासनाच्या विविध योजना तसेच शासन मदत वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. यामुळे शेतकऱ्यांवरील ताण कमी करून त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, शिवसेना (उबाठा) तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख प्रविण शिंदे, मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, शेतकरी तुषार विद्वांस आदींनी तहसीलदारांना केली आहे.
तहसीलदार विजय बोरुडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध विभागात अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान होत आहे. वेगवेगळे सरकार त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीमुळे दिलासा मिळावा ह्या उद्दशाने विविध मदत जाहीर करत असतात. त्यासाठी करण्यात येणारी मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी म्हणून शेतकऱ्यांकडून त्यांचे आधार कार्ड, बचत खाते रेकॉर्ड, संमतीपत्र (सामाईक खात्यांसाठी) व इत्यादी कागदपत्रे झेरॉक्स स्वरुपात घेत असतात.
प्रत्येक वेळेस शासने जाहीर केलेल्या कुठल्याही मदतीसाठी कायमच तीच कागदपत्र संबंधित विभागाकडे जमा करणे शेतकरी फायद्याचे नाही. त्याचा विनाकारण वेळ घालवण्यासारखे आहे. कारण वरील पैकी कुठलेही कागदपत्रे ही बदलत नाही (अपवादात्मक स्थिती वगळता) त्यामुळे महसूल विभागाचा, शासकीय यंत्रणेचा व शेतकऱ्यांचा बराच वेळ हा कागदपत्र जमा करण्यात खर्ची पडतो. त्यामुळे त्याला वेळेवर मदतीचा फायदा होत नाही.
शासनाने केलेली मदत वेळत न मिळाल्यामुळे त्यास पुढील पिकांसाठी जी मदत शासन करत असते त्याचा फायदा त्यांना होताना दिसत नाही.त्यामुळे महसूल विभागास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करून ठेवण्याची मागणी केली.





