Saurabh Vijay : यूआयडीएआयच्या सीईओपदी सौरभ विजय; सोमवारी स्वीकारला पदभार
Saurabh Vijay : महाराष्ट्र केडरच्या १९९८ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय हे यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात प्रधान सचिव (व्यय) म्हणून कार्यरत होते.

Saurabh Vijay : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) सौरभ विजय यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यूआयडीएआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महाराष्ट्र केडरच्या १९९८ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय हे यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात प्रधान सचिव (व्यय) म्हणून कार्यरत होते.
सौरभ विजय यांनी केंद्र सरकारमध्येही विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राष्ट्रपती सचिवालयात संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच वॉशिंग्टन डीसी येथील जागतिक बँकेत बांगलादेश, भूतान, भारत आणि श्रीलंका समूहासाठी कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
यापूर्वी यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर २३ एप्रिलपासून यूआयडीएआयचे उपमहासंचालक विवेक चंद्र वर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.





