Saurabh Das: CJP नेते सौरभ दास यांच्याविरोधात लुक-आऊट नोटीस जारी ; सरकारची हायकोर्टात माहिती
Saurabh Das: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक आणि प्रवक्ते सौरव दास यांना दिल्ली विमानतळावरून लंडनला जाण्यापासून रोखण्यात आल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

Saurabh Das: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक आणि प्रवक्ते सौरव दास यांना दिल्ली विमानतळावरून लंडनला जाण्यापासून रोखण्यात आल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक-आऊट सर्कुलर (LOC) जारी केले होते. त्यामुळेच त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले असून, पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
नेमके प्रकरण काय? (Saurabh Das)
सौरव दास यांना २३ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी लंडनला जाण्यापासून रोखले होते. ते लंडनमार्गे ऑक्सफर्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. या कार्यक्रमात त्यांना भारतातील ‘कॉकरोच मूव्हमेंट’विषयी आपले विचार मांडायचे होते. मात्र, विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नाही.
सौरव दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली होती. विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट फ्लॅग केल्याचे सांगितले; मात्र त्यांना कोणताही लेखी आदेश दाखवण्यात आला नाही किंवा प्रवास रोखण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही, असा दावा त्यांनी केला होता.
केंद्र सरकारने हायकोर्टात काय सांगितले? (Saurabh Das)
या घटनेनंतर सौरव दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला परदेशात जाण्यापासून रोखण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. गुरुवारी न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक-आऊट सर्कुलर जारी केले होते. या सर्कुलरच्या आधारेच त्यांना विमानतळावर थांबवण्यात आले.
दुसरीकडे, सौरव दास यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अखिल सिब्बल यांनी बाजू मांडली. संबंधित अधिकाऱ्यांनी दास यांना कोणतेही लुक-आऊट सर्कुलर असल्याची माहिती दिली नव्हती. तसेच ते कोणत्या कारणासाठी जारी करण्यात आले, याचीही माहिती देण्यात आली नव्हती, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परदेशात प्रवास करणे हा मूलभूत अधिकार असून, त्यावर अशा प्रकारे निर्बंध घालता येणार नाहीत, असा युक्तिवादही त्यांनी केला.
पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीवरूनही प्रश्न (Saurabh Das)
या प्रकरणात सौरव दास यांच्या पासपोर्टमधील काही विसंगतींचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. चेन्नई येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने २३ नोव्हेंबर रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीबाबत सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. स्पष्टीकरण सादर करेपर्यंत संबंधित पासपोर्टचा वापर करून प्रवास करू नये, असेही त्यांना सूचित करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, पासपोर्टमधील विसंगतींचा त्यांच्या भारतीय नागरिकत्वावरही परिणाम होऊ शकतो. मात्र, या मुद्द्यावर अद्याप न्यायालयाने कोणताही अंतिम निष्कर्ष दिलेला नाही.
९ डिसेंबरला पुन्हा सुनावणी (Saurabh Das)
सौरव दास यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयालाही आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या लुक-आऊट सर्कुलरमागील कारणे, पासपोर्टमधील कथित विसंगती आणि सौरव दास यांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध याबाबत न्यायालयात पुढे काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.





