कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिंदेसेनला अपेक्षित मदत झालेली नाही. महानगरपालिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांशी संधान साधतात. त्यामुळे शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. आगामी महापालिका निवडणूकीच्या वेळीही राष्ट्रवादीची अशीच भूमिका असेल तर ते योग्य ठरणारे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आताच आपली भूमिका स्पष्ट करावी, असे मत व्यक्त करताना कोल्हापूर शिंदेसेनेचे समन्वयक सत्यजित कदम यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर तोफ डागली. यामुळे पुन्हा महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शनिवारी झालेल्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात सत्यजित कदम यांनी जाहीरपणे आक्रमक भूमिका घेताना, राष्ट्रवादीला सुनावले. कदम म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून येतात, मात्र शिवसैनिक महानगरपालिकेत निवडून दिले जात नाहीत, हा चिंतेचा विषय आहे. याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात होणारे संधान कारणीभूत आहे. महायुतीमध्ये असून देखील राष्ट्रवादीकडून आमची नेहमीच फसवणूक झालेली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेतील राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी एखादा पदाधिकारी वगळता बाकी सर्वच प्रचारापासून दूर होते, असा आरोप देखील कदम यांनी केला. सत्यजित कदम यांनी 2014 मध्ये कॉंग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा लढवली होती. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक भाजपाकडून लढवली. आता त्यांनी भाजपला रामराम करताना शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी सध्या शिंदेसेनेचा महानगरपालिकेत किल्ला लढविण्याची तयारी सुरु केली आहे.