पाटण : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर राजकीय विरोधक सत्यजित पाटणकर यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या मंत्री देसाई यांनी अवघ्या चार दिवसातच विकासकामांच्या पाहणीच्या निमित्ताने समर्थकांसमवेत पाटण शहरात एन्ट्री केली. त्यादरम्यान सत्यजित पाटणकर यांनी केलेल्या टिकेवर शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे तालुक्यात राजकीय घडामोडी वाढल्या असून यापुढे पाटणकर व देसाई गटात चांगली जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का देत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली होती. तसेच मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. त्यांच्या सरकारमध्ये शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा मंत्री झाले. त्यावेळी सत्यजित पाटणकर जरी शंभूराज देसाई यांच्याकडून पराभूत झाले तरीदेखील महाविकास आघाडीत असल्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक निमित्ताने उमेदवाराच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई यांच्यासमवेत ते एकत्र आणि एकाच व्यासपीठावर आल्याचे तालुक्याने पाहिले होते. त्यामुळे एकमेकांवर टीकेला वाव नव्हता. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन ठाकरे यांच्याशी फारकत घेतली होती. त्यावेळी ठाकरे सरकार पडले. आणि सत्यजित पाटणकर यांनी शंभुराज देसाई यांचे नाव न घेता गद्दार हा शब्द वापरत टीका करणे सुरू ठेवले होते सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण शहरात एन्ट्री करून सत्यजित पाटणकर यांच्या टीकेला पहिल्यांदा प्रत्युत्तर दिले. गत विधानसभा निवडणुकीतही मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्याला प्रत्युत्तर देण्याचे टाळले होते. मात्र. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशावर मंत्री देसाई चांगलेच नाराज झाल्याचे दिसले. गद्दार असतो तर विधानस निवडणुकीत तुमची रिक्षा पल केली नसती, असा टोला त्यां सत्यजीत पाटणकर यांना यावेळ लगावला आहे. पाटणकर गट चार्ज, देसाई गटही रिचार्ज शंभूराज देसाई यांना विधानसभेत आलेले यश, मिळत गेलेली मंत्रीपदे यामुळे देसाई गट चांगलाच चार्ज झाला होता. आजही नेत्यांसह देसाई गट उत्साही आहे. मात्र, पाटणकर गटाला उभारी येत नव्हती. त्यांचे मुख्य कार्यकर्ते दिवसागणिक देसाई गटात प्रवेश करू लागले होते. मात्र वेळीच सावधगिरी बाळगून सत्यजित पाटणकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पाटणकर गट उभारी घेण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भाजप प्रवेशनानंतर पाटण शहरात सत्यजित पाटणकर यांचे स्वागत करून पाटणकर गटाने जल्लोष केला. यावर मात करण्यासाठी शंभुराज देसाई यांचा सायरन वाजवत गाड्यांचा ताफा पाटण शहरात फिरला. त्यामुळे अगोदरच चार्ज असलेल्या देसाई गटाने रिचार्ज मारल्याचे बोलले जाते.