सातारा : सातारा शहराचे विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी मी महाविकास आघाडीची नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली आहे. भाजपमध्ये ज्यांना दोन-चार माणसे जमवता येत नाहीत, त्यांच्या हातात निवडणूक देण्यात आली आहे. ही लढाई धनशक्ती आणि दंडशक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे सातारकरांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घ्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी केले. येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आघाडीच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सुवर्णा पाटील यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. त्या म्हणाल्या, आम्ही नावाने पाटील आहोत. कधीही अपमान सहन करत नाही. भारतीय जनता पक्ष सोडून, यशवंत विचारांचा वारसा सांगणार्या आणि शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीत येण्याचा माझा निर्णय धोरणात्मक आणि विचारांती घेतलेला आहे. शहर विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. समोर सत्ताधारी आणि पालिकेचा भोंगळ कारभार आहे. पालिकेच्या बैठकीत बिले कशी काढली जातात, हे शहर सुधार समितीने उदाहरणासह सांगितले आहे. धनशक्तीच्या विरोधातील ही मोठी लढाई आहे. ही लढाई जिंकणे सातारकरांच्या कल्याणासाठी गरजेचे आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आ. शशिकांत शिंदे यांचे खंबीर नेतृत्व आम्हाला लाभले आहे. ज्यांना निवडणुकीचे महत्त्व कळत नाही, त्यांचे महत्त्व उगाच वाढवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. भाजपची खालची फळी अकार्यक्षम आहे. त्यामुळे सातारकरांच्या भल्यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. महाविकास आघाडीकडून मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. या संधीचे मी निश्चित सोने करेन. प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी आहे. आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोहोचू किंवा न पोहोचू; परंतु शहराच्या भविष्यासाठी सातारकरांनीच ही निवडणूक हातात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनीही भारतीय जनता पक्षावर आणि पालिकेत गेल्या चार वर्षांत झालेल्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली.