Satara ZP Politics: डिस्कळ (ता. खटाव) सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या बुध जिल्हा परिषद गटाच्या सदस्य लता अविनाश कर्णे यांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निषेधार्थ रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता डिस्कळ येथे निषेध मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी सरपंच राजीव शिपटे व दत्तात्रय गोडसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. शिपटे व गोडसे यांनी सांगितले की, बुध जिल्हा परिषद गट हा स्थापनेपासून पुरोगामी विचारसरणीचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागातील मतदारांनी नेहमीच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारांना पाठिंबा दिला असून भाजपच्या उमेदवारांना कधीही स्वीकारले नाही. त्यामुळे या गटातील राजकारणाला विशिष्ट विचारांची पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लता कर्णे यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले. गावोगावी फिरून, संघटन मजबूत करून आणि जनतेचा विश्वास संपादन करून कर्णे यांना विजयी करण्यात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता. या प्रयत्नांचे फलित म्हणून कर्णे या सुमारे १७०० मतांनी विजयी झाल्या. हेही वाचा – Nanded News: पाच दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना कार्यकर्त्याच्या मृत्यूचं गुढ उकललं; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी मात्र, विजयानंतर लगेचच त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत, हा मतदारांच्या विश्वासाला तडा देणारा निर्णय असल्याचे शिपटे व गोडसे यांनी म्हटले आहे. “ज्या जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले, त्या जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम लता कर्णे यांनी केले,” अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या निर्णयामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता स्थापन होण्यास अडथळे निर्माण झाले, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, पक्षातील वरिष्ठ नेते किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असा आरोपही करण्यात आला. कृषी व पशुसंवर्धन सभापती पद मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, हा संताप व्यक्त करण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिपटे व गोडसे पुढे म्हणाले की, बुध जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. त्यामुळे लता कर्णे यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. “यापुढे कोणताही कार्यकर्ता त्यांच्या दारात विकासकामासाठी जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या निषेध मोर्चा व जाहीर सभेला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, त्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप विधाते, जोतीनाना सावंत यांचा समावेश आहे. या सभेत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुध व खटाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.