Satara ZP Election – कोयना परिसरात सध्या भक्ती आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान ग्रामदेवतांच्या यात्रांचा उत्सव सुरू असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे “देवाची कृपा आधी की मताची मर्जी?” असा सवाल गावोगावी चर्चेचा विषय ठरत आहे. यात्रेच्या निमित्ताने गावात परतलेले चाकरमानी आणि त्यातून निर्माण झालेली गर्दी ही यंदाच्या निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणारी ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. कोयना विभागातील किसरुळे, रासाटी, बोपोली, गोषटवाडी, गोकुळ ,हूंबरळी, मिरगाव, गाडखोप, वाझोळे तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये ग्रामदेवतांच्या यात्रांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देवदर्शन, ओटीभरणी, पालखी मिरवणूक, भजन-कीर्तन, कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.या यात्रांच्या निमित्ताने मुंबई, पुणे व अन्य शहरांत नोकरीनिमित्त गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावी परतले आहेत. “गावची यात्रा चुकवायची नाही” या भावनेतून आलेले हे चाकरमानी पुन्हा एकदा गावच्या मातीशी नातं जोडताना दिसत आहेत. अनेक महिन्यांनंतर कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र आल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र यंदा ही यात्रा केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कारण बहुतांश यात्रांचा कालावधी मतदानाच्या अगदी आधीचा असल्याने, यात्रा संपताच अनेक चाकरमानी पुन्हा शहराकडे परतणार आहेत. त्यामुळे “मतदान करूनच जा” अशी विनंती गावागावात सुरू आहे.यात्रेच्या ठिकाणी, चहाच्या टपरीवर, देवळाच्या पायऱ्यांवर, कुस्त्यांच्या फडाजवळ किंवा गप्पांच्या फडात राजकीय चर्चा रंगताना दिसत आहेत. उमेदवार आणि कार्यकर्तेही या यात्रांचा फायदा घेत मतदारांशी थेट संवाद साधत असून, आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे देवाच्या दर्शनासाठी गर्दी, तर दुसरीकडे मतांची गणितं मांडली जात आहेत. त्यामुळे यंदा कोयना भागात यात्रा हा केवळ धार्मिक सोहळा न राहता निवडणुकीचा निर्णायक टप्पा ठरत आहे.देवाची कृपा आणि मतदारांचा कौल या दोन्हींचा संगमच यंदाच्या निवडणुकीचा निकाल ठरवणार, हे मात्र नक्की.