Satara Zilla Parishad – सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचे स्पप्न भंगले आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद गटांमध्ये ओबीसी महिलांमध्ये रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेवर आल्यास वाठारस्टेशन गटाच्या जयश्री भोसले व औंध गटाच्या मनिषा फडतरे या दावेदार असणार आहेत. भाजप सत्तेत आल्यास आंधळी गटाच्या सोनल गोरे व कुडाळ गटाच्या जयश्री गिरी या भाजपकडून दावेदार असणार आहेत. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणे सध्या तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असली तरी भाजपने काही जादू केल्यास भाजपही सत्तेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सातारा जिल्हा परिषदेत लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, जससिंगराव फरांदे, ज्योती जाधव, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर, सुभाष नरळे, हेमलता ननावरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, उदय कबुले यांच्यासह अनेकांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकालात कामाचा ठसा उमटवला. अनेकांना आरक्षणामुळे या पदावर काम करण्याची संधी मिळाली. यावर्षीही पुढील पाच वर्षासाठी ओबीसी महिलेला अध्यक्षपदाची आरक्षणाने संधी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साह दिसून येत असला तरी सत्ता कोणाची येणार यावर ही संधी उपलब्ध असणार आहे.सातारा जिल्हा परिषदेवर १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. सध्य परिस्थितीत केंद्रात भाजप व राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीची (अजित पवार गट) सत्ता आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणूक जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला शह देत भाजपने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मुसंडी मारली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र त्यामध्ये त्यांना फारसे यश न आल्याने भाजपच्या गोटात सध्या शांतता आहे. सध्य परिस्थितीत पालकमंत्री शंभूराज देसाइ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आल्यास वाठार स्टेशन गटातील राष्ट्रवादीच्या जयश्री भोसले, औंध गटातील मनिषा फडतरे, बुध गटातील लता कर्णे, शिवसेनेच्या मारुल हवेली गटातील योगिता गिरी, मल्हारपेठ गटातील विजया कुंभार या राष्ट्रवादी व सेनेकडून दावेदार असणार आहेत. यामध्ये जयश्री भोसले आणि मनिषा फडतरे या दोघींपैकी एका महिलेला संधी मिळेल असे सुत्रांकडून समजत आहे. भाजपची सत्ता आल्यास कुडाळ गटातील जयश्री गिरी, कोडोली गटातील नीता खरात, विंग गटातील शैलजा शिंदे, काले गटातील मनिषा पाटील या दावेदार असणार आहेत. याचबरोबर आंधळी गटात सर्वसाधारण प्रवर्गातून विक्रमी मताधिक्क्याने विजयी झालेल्या सोनल गोरे याही प्रबळ दावेदार आहेत. भाजप सत्तेत आल्यास जयश्री गिरी, सोनल गोरे या दोघींपैकी एका महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे.