satara | बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी युवक ताब्यात
Updated On:

कराड, (प्रतिनिधी) – मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरून मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास देशी दारूची बेकायदा वाहतूक करणार्या रवींद्र संजय पवार (वय 36, रा. गुरुवार पेठ, कराड) याला पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेतले.
कराड-मलकापूर (बैल बाजार) रस्त्यावरून देशी दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक सागर बर्गे, हवालदार पवार आणि कोळी यांनी या रस्त्यावर गणपती मंदिरानजीक सापळा रचून, मलकापूरकडे निघालेली व्हॅन (एमएच-05-एच-3314) अडवली.
व्हॅनची तपासणी केली असता, देशी दारुच्या 24 हजार रुपये किमतीच्या 480 बाटल्या आढळल्या. दारूच्या बाटल्या व व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस नाईक सागर बर्गे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





