सातारा | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या कागदपत्रासाठी महिलांची गर्दी

वाठार स्टेशन – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसाठी सोमवार दि. १ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरणी सुरू झाली असल्याने वाठार स्टेशन येथील तलाठी कार्यालयात रहिवासी दाखला व उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली असल्याने महिलांची कागदपत्र जुळवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या योजनेस लागणारी महत्त्वाची कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला घेण्यासाठी वाठार स्टेशन येथील तलाठी कार्यालयात महिलांची रांग लागली आहे.





