फलटण : साखरवाडी, ता फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फलटण तालुक्यातील विविध गावांमधून ४० हुन अधिक महिला या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसूती झाली आहे अशा महिलांकडून प्रत्येक सिझरसाठी १ हजार या ‘दरानुसार’ वैद्यकीय अधिकार्यांनी पैसे घेतले. यामध्ये दोन प्रसूती सिझर असणाऱ्या महिलांकडून २ तर तीन प्रसूती सिझर झाले असणाऱ्या महिलांकडून ३ हजार रुपये घेतले असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य कुटुंब ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशांसाठी विविध उपचार, गोळ्या औषधे व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अधिकाधिक नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात कराव्यात म्हणून शासन गाव पातळीवर विशेष प्रयत्नशील असते. प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या आशा सेविका या गावामध्ये दोन व अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबीयांचा सर्वे करून त्यांची माहिती घेऊन त्यांना शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे फायदे समजावून सांगत असतात. सध्या कुटुंब नियोजनासाठी खाजगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च येत असल्यामुळे सर्वसामान्य व सधन कुटुंबातील महिलांचा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आयोजित असणाऱ्या कॅम्पमधून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी कल वाढलेला आहे. मात्र,जिल्ह्यात साखरवाडीत वैद्यकीय अधिकारी मागील अनेक दिवसांपासून पैसे घेत आहेत. हे पैसे वैद्यकीय अधिकारी स्वतः न घेता भाषा सेविकांना अशा महिलांकडून तुम्हाला प्रत्येकी सिजरसाठी हे पैसे द्यावे लागतील व ते पैसे नंतर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे सांगितले जाते. पैसे दिले तरच शस्त्रक्रिया सकाळी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जर आशा सेविकांकडे पैसे दिले तरच त्या महिलांना भुलीचे इंजेक्शन दिले जाते, अन्यथा अशा महिलांना ऑपरेशनसाठी वेळप्रसंगी टेबलवरून खाली उतरवण्याच्या सुद्धा घटना या आधी घडल्या असल्याचे एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने सांगितले. अशा अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांचे जर शोषण करून अडवणूक होत असेल तर गोरगरिबांनी न्याय कुठे मागायचा असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची दहशत नजीकच्याच गावातील एका महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला ३ हजार रुपये भरण्यास सांगितले मात्र ती महिला पैसे देऊ शकली नाही त्यामुळे तिची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया या कॅम्पमध्ये झाली नाही है दुर्दैवी आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. या अधिकाऱ्यावर नक्की ‘वरदहस्त’ कोणाचा? ज्या ठिकाणी या शस्त्रक्रियेचा कॅम्प असतो तेथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी सुद्धा या अधिकाऱ्यापुढे अक्षरशः हतबल आहेत.