सातारा : क्या हुआ तेरा वादा, वो डांबर वो रस्ता…

पंधरा दिवसांचे आश्वासन पूर्ण न केल्याने संतप्त नागरिकांची पुन्हा बॅनरबाजी
कराड – येथील मार्केट यार्ड परिसरात गेट नंबर एक ते बैलबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने तेथील नागरिकांनी मागील महिन्यात पाच सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी फलक लावून आपला रोष व्यक्त केला होता. या परिसरातील नगरसेवकांच्या समर्थकांनी संबंधित रस्ता मंजूर झाला असून, 15 दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याच्या पोष्ट ही सोशल मिडयावर व्हायरल केल्या आहेत.
आता या गोष्टीला महिना होत आला तरी रस्त्या जैसे थे अवस्थेतच असल्याने रविवारी पहाटे पुन्हा येथील नागरिकांनी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे याची पुन्हा सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
कराड शहरातील बहुतांशी सर्व रस्ते नवीन करण्यात आले आहेत. मात्र गेट नंबर एक ते बैलबाजार कडे जाणाऱ्या रस्त्याची दूरावस्था झाली आहे याकडे कोणी लक्ष देत नसल्याने येथील नागरीक संतप्त आहेत. यांच्या संतापाचा पारा मागच्या महिन्यात ही पहावयास मिळाला. तेथील नागरीकांनी अचानक पहाटेच्यावेळी पालिका व संबंधित पुढाऱ्यांना जागे करण्यासाठी या भागात बॅनरबाजी केली.
खराब रस्त्याकडेला किती अपघातानंतर मला दूरूस्त करणार: होय…मी रस्ता बोलतोय. रस्त्यासोबत आमच्या शरीराचा पण झाला खूळखूळा:एक त्रस्त नागरिक….., आयुष्य खूप सूंदर आहे फक्त मतदान विचार करून करा: होय मी रस्ता बोलतोय…., इलेक्शन का टाईम आ गया, मेरा नंबर कब आयेगा: होय…मी रस्ता बोलतोय…, आता नागरिकांची एकच मागणी ..रस्ता व नगरसेवक नवीन हवा…होय ..मी रस्ता बोलतोय…, अमचं ठरलय तूम्ही ही ठरवा…एक त्रस्त नागरिक…अशा आशयाचे फलक लावण्यात आले. त्यानंतर काही वेळा नंतर हे फलक तेथून हटवण्यात आले. या फलकांची सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाल्यानंतर त्या परिसरातील नगरसेवकांच्या समर्थकांनी सबंधित रस्ता मंजूर झाला असून15 दिवसात रस्त्याचे काम पुर्ण होणार असल्याच्या पोष्ट ही सोशल मिडयावर व्हायरल केल्या.
आता या गोष्टीला महिना उलटला तरी या रस्त्यावर अजून डांबर पडलेले नाही. त्यामुळे येथिल नागरिकांना रविवारी पुन्हा बॅनरबाजी केली. ये पब्लिक है सब जानती है ये पब्लिक है…., याद है मूझको तूने कहा था रस्ता करेंगे 15 दिनमे…, क्या हूआ तेरा वादा वो डांबर वो रस्ता….अशा आशयाचे फलक लावले होते. मागील अश्वासमाला महिना झाला तरी अद्याप रस्ता न झाल्याने क्या हूआ तेरा वादा म्हणत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आठवण करून देण्यात आली आहे. शहरात या लक्षवेधी फलकांची चर्चा मात्र चांगलीच सुरु होती.





