रामराजे; आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही सातारा – आम्ही एकदा निर्णय घेतला की मागे वळून बघत नसतो. आम्हाला कोणाशीच वाद घालायचा नसून जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, तो राहील यादृष्टीने आम्ही काम करणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. चर्चा होत असतात. मात्र, आम्ही लवकरच चांगली बातमी आणू, असे संकेत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. येथील दूध संघ कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयाचा शुभारंभ करुन जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर रामराजे बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, किरण साबळे- पाटील, डी. के. पवार आदी उपस्थित होते. रामराजे म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयीन लढाई सुरु असून या वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यालय ट्रस्टची प्रॉपर्टी आहे. या कार्यालयावर हक्क न सांगता आम्ही नव्या ठिकाणी कार्यालय सुरु केले आहे. आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नसून जिल्ह्यात अजित पवार यांची ताकद वाढवण्याचे काम करायचे आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून अद्याप जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही. निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने दिवाळीनंतर प्रत्येक तालुक्यात मोर्चेबांधणी करुन सभा घेणार आहोत. येत्या 15 दिवसात जिल्हा व तालुका कार्यकारिणीची बांधणी करण्यात येणार आहे.” गेल्या काही दिवसांपासून आ. मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. अद्याप त्या चर्चाच असल्या तरी लवकरच आम्ही चांगली बातमी घेऊन येऊ, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील दुष्काळाचा प्रश्न महत्वाचा असून याबाबत शासनस्तरावरुन मदत मिळवणार आहे. माण, खटावमध्ये दुष्काळी जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सरकारची भूमिका असल्याचे आ. रामराजे म्हणाले. आ. मकरंद पाटील म्हणाले, “किसन वीर कारखान्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. सरकारकडे मदत मागितली असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. वाई व फलटण मतदारसंघात आमचा पक्ष भक्कम असून उर्वरित ठिकाणी आम्ही भक्कम बांधणी करत आहोत.” राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या बैठकीस प्रत्येक तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात पक्ष बळकट करण्यावर आमचा भर राहील, असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. अमित कदम जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची यापूर्वीच निवड झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार रविवारी अमित कदम यांची पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी निवास शिंदे यांची वर्णी लागली असून उर्वरित कार्यकारिणीची लवकरच निवड केली जाईल, अशी माहिती आ. रामराजे यांनी यावेळी दिली.