Satara : कालव्याद्वारे बांधापर्यंत पाणी पोहचवणार

दहिवडी : माणच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक आपल्याला पुसायचा आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपल्या बांधापर्यंत कॅनॉलने पाणी लवकरच पोचवणार आहे, असे आश्वासन ग्रामीण विकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिले.
बिदाल शेरेवाडी (ता. माण) येथे श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा व सभामंडप भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रताप भोसले, माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे, माजी उपसरपंच तानाजीराव दादा मगर, तुकाराम मगर, शंकर जगदाळे, किरण जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. गोरे म्हणाले, ‘‘हे मंदिर पूर्ण झाले आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदारकीनंतर आता मंत्रीपद मिळाले. आपल्या वाडीचे प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडवले जातील.
शेतकऱ्यांचा अनेक दिवसांचा पाण्याचा प्रश्न आहे. बांधापर्यंत पाणी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पूर्वी आपल्या मुली फलटण- बारामती- कोल्हापूर- कराड या ठिकाणी दिल्यानंतर त्या मुलींची दुष्काळातून आली आणि आम्हाला शिकवते अशी टिंगल केली जात होती. परंतु, आता हा कलंक पुसला गेला आहे.
राज्यामध्ये मंत्री म्हणून आपले काम उठून दिसले पाहिजे यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन ग्रामस्थ व महिलांच्या हस्ते करण्यात आले. महालक्ष्मी सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. महालक्ष्मी कलशारोहण सोहळा महेशगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. सुरुवातीला कलशाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
कैलास मगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, प्रकाश मगर, नवनाथ जगदाळे, अशोक मगर, विष्णू भोईटे, संदीप मगर, दिलीप मगर, पोपट जगदाळे, भरत पिसे, दिलीप वाघ, सुरेश वाघ, रामदास वाघ, प्रतीक मगर, चंद्रकांत भुजबळ, गणेश पिसे, विलास जगदाळे, दीपक मगर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.





