Satara Water Scarcity – जिल्ह्याच्या माण, खटाव, वाई, पाटण, खंडाळा तालुक्यात ३४ टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. भुजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांना सध्या आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. सध्या जिल्ह्यात ४३ गावे, १८६ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टॅंकर सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणी पातळीत मोठी घट होऊन विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने विहिरींची पाणी पातळी खालावत आहे. परिणामी गावोगावी नळांद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होणार असल्याने पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सध्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होताना दिसत आहे. ग्रामपंचायतींच्यावतीने आठवड्यातून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळी पाऊस न झाल्याने टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा टँकर. माण तालुक्यात २९ गावे व १६६ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागल्याने शासकीय ४ व खासगी १३टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ३१ हजार ४७ लाेकसंख्या व ६ हजार ६१२ पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात ४ गावे, ६ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ४ हजार ३१२ लाेकसंख्या व १ हजार ८८० पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यात ६ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा होत असून एक हजार २१२ लाेकसंख्या व ९९३ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. खटाव तालुक्यात ९ गावे व ८ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून १० हजार २१२ लाेकसंख्या आणि ५३० पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यात एका गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ५०६ लाेकसंख्या व १८८ पशुधन अवलंबून आहे. दुष्काळाची दाहकता वाढून लागल्याने प्रशासनाकडून २० विहिरी व १४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याचे श्री. चक्के यांनी सांगितले.