Satara Water Scarcity – जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत माण, खटाव, वाई, पाटण या तालुक्यांमधील 28 गावे, 163 वाड्यांना 25 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. भूजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात सध्या आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा होत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे गावोगावी नळांद्वारे पाणीपुरवठा कमी झाला आहे. ग्रामपंचायतींच्यावतीने आठवड्यातून दोनदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळी पाऊस न झाल्याने टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. माण तालुक्यात 22 गावे व 143 वाड्यांना शासकीय चार व खासगी 9 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर 23 हजार 73 लोकसंख्या, तीन हजार 40 पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात चार गावे, सहा वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावर चार हजार 312 लोकसंख्या व एक हजार 880 पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यात सहा वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत असून, एक हजार 212 लोकसंख्या व 993 पशुधन अवलंबून आहे. खटाव तालुक्यात दोन गावे व आठ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, दोन हजार 772 लोकसंख्या अवलंबून आहे. टंचाई परिस्थितीत प्रशासनाने 14 विहिरी व नऊ बोअरवेल अधिग्रहीत केल्याचे चक्के यांनी सांगितले.