Satara Water Scarcity – जिल्ह्याच्या बहुतांश भागात भूजल पातळीत घट होत असून सद्यस्थितीत माण, वाई आणि पाटण तालुक्यात २३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ग्रामीण भागात सध्या काही ठिकाणी ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा होत आहे. सध्या जिल्ह्यात २६ गावे व १५५ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने विहिरींची पाणी पातळी खालावल्याने गावोगावी नळांद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होणार असल्याने पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सध्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होताना दिसत आहे. ग्रामपंचायतींच्यावतीने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नियोजन होत असून आठवड्यातून दोनदा नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळी पाऊस न झाल्याने टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. माण तालुक्यात २२ गावे व १४३ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागल्याने शासकीय ४ व खासगी ९ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर २३ हजार ७३ लाेकसंख्या व ३ हजार ४० पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात ४ गावे, ६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ४ हजार ३१२ लाेकसंख्या व १ हजार ८८० पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यात ६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत असून एक हजार २१२ लाेकसंख्या व ९९३ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ११ विहिरी व ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याचे श्री. चक्के यांनी सांगितले.