Satara : माण तालुक्यात ३१ गावे, २१८ वाड्यांना टॅंकरने पाणी

सातारा : माण तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून माण तालुक्यात ३१ गावे २१८ वाड्यांना प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाकडून गतीने उपाययोजना करण्यात येत आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश्य गावांमध्ये उपाययोजना सुरु केल्या आहेत. यावर्षी माण तालुक्यातील बिजवडी, मोही, धुळदेव,वरकुटे म्हसवड, कारखेल,हवालदारवाडी, जाशी, पांगरी, डंगिरेवाडी, थदाळे, भाटकी, संभुखेड, पळशी, मार्डी, खुटबांव, येळेवाडी, पाचवड, राजवडी, वावरहिरे, अनभुलेवाडी, पर्यंती, खडकी, रांजणी, इंजबाव, वारुगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, दोरगेवाडी, जाधववाडी अशा ३१ गावे व लगतच्या २१८ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागल्याने शासकीय २ व खासगी ३० अशा ३२ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ४३ हजार १८९ लाेकसंख्या व २३ हजार ९०१ पशुधन अवलंबून आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ११ विहीरी व ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
दरम्याण, माण तालुक्याप्रमाणे कोरेगाव, फलटण, खटाव, पाटण तालुक्यातही काही गावांमध्ये टंचाइची दाहकता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर टॅंकर मागणीचे प्रस्ताव करण्याची प्रक्रिया अनेक गावांमधून सुरु आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून उन्हाळी पाऊस झाला नाही तर निदान अडीच महिने पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.
पाटण तालुक्यात एक टॅंकर सुरु
माण प्रमाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाइ जाणवत आहे. पाटण तालुक्यातील चाफळ परिसरातील जाधववाडी – जंगलवाडी गावास एका खासगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १९१ नागरिक व २३५ पशुधन अवलंबून आहे. माण तालुक्यानंतर आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी टंचाईच्या झळा बसून लागल्याने आगामी काळात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.





