सातारा – वाई येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सोमवार, दि. 3 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी दिली. आयटीआयमध्ये कारखान्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित केले जाते. ग्रामीण भागातील लोकांना कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सहाय्य केले जाते. संस्थेत कम्प्युटर ऑपरेटर, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, पेंटर जनरल, शीट मेटल वर्क हे ट्रेड उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन, एसटी पासची सुविधा दिली जाते. मुलांसाठी वसतिगृहदेखील आहे. आयटीआयमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. दहावी आणि बारावी समकक्षता असल्याने, आयटीआयसोबतच विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय झाल्यानंतर एकाच वेळी आयटीआय कोर्स पूर्ण केल्याचे आणि बारावीचे प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांची दोन शैक्षणिक वर्षांची बचत होणार आहे. वाई, शिरवळ, सातारा येथील औद्योगिक वसाहतींमधील नामांकित कंपन्यांमध्ये आयटीआयमधील उमेदवारांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आयटीआयमधील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये अत्याधुनिक मशिनरी व तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. आयटीआय प्रवेशासाठी ुुु.रवाळीीळेप.र्वींशीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी आयटीआय, पी-17, एमआयडीसी, मांढरदेव रोड, वाई येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य उपाध्ये यांनी केले आहे.