सातारा: वाघोलीच्या पठाण दाम्पत्याचा “टिकटॉक’वर धुमाकूळ

संतोष पवार
सातारा – देशभरात टिकटॉक व्हिडिओने धुमाकूळ घातला असून आता ग्रामीण भागातही “टिकटॉक’ वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. लहानसे मजेदार व प्रेरणादायी व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर त्याला चांगलीच पसंती मिळू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील वाघोली (ता. कोरेगाव) येथील सुलेमान पठाण व त्यांची पत्नी रुकसान पठाण या दाम्पत्याने तर “टिकटॉक’वर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला 12 लाख 92 हजार फॉलोअर्स असून 4 कोटी 1 लाख लाईक्स त्यांना मिळाल्या आहेत. दर 28 दिवसाला 15 कोटी 17 लाख लोक या दाम्पत्यांचे टिकटॉक व्हिडिओ पाहत आहेत.
जगातील सर्वात लोकप्रिय ऍप्लिकेशनपैकी टिकटॉक एक आहे. आजवर जगभरात शंभर कोटींहून अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. बऱ्यापैकी करमणुकीचे व्हिडिओ या ऍपवर पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेच्या आकडेवारीत टिकटॉक दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्वी शहरी भागात हे ऍप चांगलेच प्रसिध्द झाले होते. आता मात्र या ऍपची लोकप्रियता गावोगावी पोहोचली आहे. युवा पिढीचे खास आकर्षक टिकटॉक ऍप बनले आहे. अनेकजण या ऍपवर व्हिडिओ बनवतात मात्र सर्वांचेच व्हिडिओ लोकप्रिय होतात असेही नाही. काहीजण टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवतात तर काही जण त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांची कला जगासमोर जावी यासाठी या ऍपच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतात.
वाघोली येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुलेमान पठाण यांनी टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलोपार्जित शेती उद्योग आणि शेळी पालन व्यवसाय सांभाळत पठाण यांनी पत्नी रुकसाना यांच्यासमवेत बनवलेले व्हिडिओ लोकप्रिय होत आहेत. मराठी, हिंदी गाणी, विनोद, सण, उत्सवावर आधारित व्हिडिओंना जोरदार पसंती मिळत आहे. शेती व्यवसाय करत असताना हे दाम्पत्य मोबाईल स्टॅण्डद्वारे व्हिडिओ बनवत आहे.
सुरुवातीस त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला मात्र गेल्या वर्षभरात पठाण दाम्पत्याने टिकटॉकवर धुमाकूळ घातला आहे. अल्पावधीत सुमारे 12 लाख फॉलोअर्स, 4 कोटी 1 लाख लाईक्स मिळवून त्यांनी आपल्यातील कला दाखवून दिली आहे. दर 28 दिवसाला 15 कोटी 17 लाख लोक या दाम्पत्याचे व्हिडिओ पाहत असल्याचे पुढे आले आहे. वाघोलीसारख्या ग्रामीण भागातील दाम्पत्य टिकटॉकच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे.
सुलेमान पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वडिलोपार्जित शेती होती. शेतीला शेळीपालनाची साथ मिळाली. नोकरीच्या मागे लागलो असतो तर आई, वडिलांची पूर्ण वेळ सेवा करण्याची संधी मिळाली नसती. संगणक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही आम्ही दोघे शेतीत रममाण झालो. शेतातील मका भिजवत असताना टिकटॉकवरील पहिला व्हिडिओ “समंदर में, किनारा तू’, या गाण्यावर केला. हा व्हिडिओ बनवत असताना आमच्या व्हिडिओंना एवढी लोकप्रियता मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणखी वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला मिळत गेली.
सध्याच्या परिस्थितीत नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये विविध प्रयोग राबवणार आहे. नोकरीच्या मागे न लागता सामान्य शेतकरी कुटुंबातील जोडपेही कुटुंबाला शेतीच्या माध्यमातून स्थिरता आणून प्रगती करु शकते, हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुलेमान पठाण आणि रुकसान पठाण यांनी सांगितले. काही मालिकांमध्ये काम करण्याच्या ऑफरही येऊ लागल्या असल्याचे त्यांनी सांगितले.फ
चित्रपटात काम करण्याची होती इच्छा
सुलेमान पठाण आणि रुकसान पठाण या दाम्पत्याची चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्याची पहिल्यापासून इच्छा होती. पहिल्यापासून त्यांना अभिनयाची आवड होती. मात्र ग्रामीण भागातील कलाकारांना फारशी संधी मिळत नसल्याने कला सादर करण्याचे गुण असताना हे दाम्पत्य दुर्लक्षित राहिले. मात्र टिकटॉकच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना उभारी मिळाली आहे. टिकटॉकवर लोकप्रिय झाल्याने आता विविध कार्यक्रमांच्या उदघाटनांना, जाहिरातीसाठी त्यांना बोलावण्यात येत आहे. आगामी काळात संधी मिळाली तर चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.





