सातारा: बामणोली येथे बोट रॅलीच्या माध्यमातून मतदान जागृती

बामणोली – कोयना प्रकल्पाच्या शिवसागर जलाशयातून बामणोली येथून तेटली या ठिकाणापर्यंत बोट रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत दुर्गम विभागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध कार्यालयांच्यावतीने जनजागृती मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत बामणोली येथे आयोजन करण्यात आले होते.
बामणोली येथे मानवी साखळीच्या माध्यमातून व बोट रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. बामणोली येथील प्राथमिक केंद्र शाळा, बामणोली शाळेतील श्रुतिका पवार, प्राथमिक शाळा पावशेवाडी शाळेतील श्रेया पवार यांनी भाषण करुन मतदान जागृती केली. बामणोलीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील विध्यार्थ्यानी पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी भाषण व पथनाट्यांच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान करावे अशी जन जागृती करण्यात आली.
मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडून दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असा संदेश देणाऱ्या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद, जावळी पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालयांच्यावतीने मानवी साखळी तयार करण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, वनक्षेत्रपाल व्ही. डी. बाटे तसेच सर्व विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच बामणोली विभागातील प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षिका, सेविका, बोट व्यावसायिक, विभागातील ग्रामस्थ आदी लोक उपस्थित होते.
कोयनेच्या तिरी मतदानाची शपथ
बामणोली येथे कोयना शिवसागर जलाशयाच्या तिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाचा हक्क बजवा, चला जावूया मतदान करायला, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सेल्फी पॉइंटवर मतदान जागृती
वन विभागच्या माध्यमातून माझा सह्याद्री माझा अभिमान ,व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा सथ्ळ, अशा प्राण्याच्या पोस्टच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावणार अशा सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला.





