सातारा: सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मतदान जनजागृती

सातारा – मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून, लोकशाही अधिक बळकट करावी, यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघात स्विप अंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मतदान जनजागृतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी संजय शेरे, महेंद्र शेरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदानाचा निर्धार करत, तशी प्रतिज्ञा घेतली.
लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी स्विप उपक्रमांतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघात प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्विपचे नोडल अधिकारी सचिन जाधव व सहकारी गावोगावी फिरून, मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या उपक्रमांतर्गत चवणेश्वर येथे मतदान जनजागृती कार्यकम घेण्यात आला.
यावेळी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे आहे. बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) रोजी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन सचिन जाधव यांनी केले.
विशेष म्हणजे चवणेश्वर येथील नेव्ही ऑफिसर संजय शेरे व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शेरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुरू असताना, या दोघांनी स्विप उपक्रमात सहभाग नोंदवून, प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन केले. ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा’, ‘आपले मत आपले भविष्य’, मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘संकल्प आमचा शंभर टक्के मतदानाचा’ अशा घोषणा देण्यात आल्या. मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
या उपक्रमात उपसरपंच संतोष पवार, माजी सरपंच दयानंद शेरे, जितेंद्र जगताप, सदाशिव जगताप, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कांबळे, रमेश पवार, हरिदास शेरे, युवराज शेरे, संतोष शेरे, सतीश सूर्यवंशी, उद्धव पवार, हणमंत सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, सौ. माधुरी शेरे, परमेश्वर पवार, सचिन पवार सहभागी झाले होते.





