सातारा (प्रतिनिधी) : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी देवदर्शन करून येणाऱ्या अर्जुन मोहन यादव (वय 25 वर्षे, रा.सिद्धनाथवाडी) याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली होती.
ही घटना भरदिवसा घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे. संशयितांनी पुण्यात राहण्यास असलेल्या अर्जुनला इस्टाग्राम या सोशल माध्यमावर मुलीच्या नावाने खाते उघडून प्रेमाच्या जाळ्यात ओढला. त्यानंतर त्याला साताऱ्यातील नटराज मंदीर परिसरात भेटण्यास बोलवून त्याचा गेम केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मृत अर्जुन याने काही महिन्यापूर्वी वाईत गोळीबार केला तसेच त्याच्या वाढदिवसादिवशी भैय्या नामक तरूणाच्या घरासमोर फटाके वाजवले होते. तेव्हापासून अटकेतील तीन संशयित व इतर दोन मास्टर माईंड असलेले तरूण अर्जुनला गाठण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, अर्जुन हा तडीपार असल्याने तो सध्या पुणे येथे वास्तव्यास होता. त्यामुळे अर्जुन संशयितांच्या टप्प्यात येत नसल्याने त्यांनी त्याला साताऱ्यात बोलवण्याची नामी शक्कल लढवली.
इस्टाग्राम या सोशल माध्यमावर एका तरूणीच्या नावाने खाते उघडण्यात आले. त्या खात्यावरून अर्जुनसोबत चॅटींग करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दि. 2 रोजी साताऱ्यातील नटराज मंदीर परिसरात भेटण्यास बोलवण्यात आले होते. त्यानुसार अर्जुन त्याच्या एका मित्रासोबत पुण्यावरून साताऱ्यात आला व सोबतच्या मित्राला बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सोडून तो नटराज मंदिर परिसरात त्या अभासी प्रियसीला भेटण्यासाठी गेला होता.
तिथे अगोदरच त्याच्यावर नेम धरून असलेल्या संशयितांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अर्जुनच्या डोक्यात लागल्याने तो खाली कोसळल्यानंतर दुसऱ्या एका अल्पवयीन संशयिताने त्याच्या पोटात गोळी झाडून त्याचा काटा काढला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन अल्पवयीन तरूणांना पुण्यातून ताब्यात घेतले असून मुख्य संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.