सातारा | समस्यांच्या विळख्यात अडकले वडूज

वडूज – खटाव तालुक्याचे ठिकाण असलेले वडूज शहर सध्या अनेक समस्यांचा विळख्यात सापडले असून या समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी एकमुखी मागणी जागृत ग्राहक राजा यासह विविध ग्राहक संघटनांनी खटाव तालुका ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत केली.
खटाव तालुका ग्राहक संरक्षण समितीची बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार सौ. बाई माने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीला वडूजचे मुख्याधिकारी कपिल जगताप, पोलीस निरीक्षक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता खोत, जागृत ग्राहक राजाचे राज्य सचिव प्रा. नागनाथ स्वामी, जिल्हाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, तालुकाध्यक्ष विनोद लोहार, वडूज शहराध्यक्ष विक्रम काळे, मुन्ना मुल्ला, संभाजी इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्राहक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्राहकांच्या विविध तक्रारींचा निपटारा यावेळी करण्यात आला.
प्रा. नागनाथ स्वामी म्हणाले, वडूज शहरातील बस स्थानक ,तहसील कार्यालय परिसरातील बेशिस्त वाहतूक व पार्किंग व्यवस्था, सुसाट दुचाकीस्वार, हॉर्नचे कर्कश आवाज, डोळ्यांना इजा पोचविणारे वाहनांचे हेड लाईट, रस्त्यावरील अंधुक दिवे, न झालेली डास निवारक फवारणी, कचरा संकलनाचे बेशिस्त वेळापत्रक, डबघाईस आलेल्या कचरा गाड्या, रस्त्यालगत बसणारे विक्रेते, फूटपाथ, रस्ता दुभाजक, सांडपाणी व्यवस्था, रस्त्यावरील स्टॉल, हॉस्पिटल, मंगल कार्यालये, दुकाने यापुढील वाहनांची गर्दी, पाणी पुरवठ्यासाठी काढलेले चर, रस्त्यातील खड्डे, त्यामुळे सातत्याने होणारे अपघात, भांडणे यामुळे बाहेरून येणारे विद्यार्थी, अभ्यागत व येथील नागरिक प्रचंड त्रासले आहेत.
जिल्हाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी म्हणाले, शहरात मिरवणुकीतील वाद्यांचे जीवघेणे आवाज व डोळ्यांना इजा पोंचवणारे दिवे यामुळे लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या सर्वच प्रश्नांबाबत मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या दूर कराव्यात, अशी मागणी सर्वच ग्राहक संघटनांनी केली. या समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून तातडीने दूर करण्याचे आश्वासन सौ. बाई माने, कपिल जगताप, सोनवणे व खोत यांनी दिले. संयोजन पुरवठा अधिकारी शिंदे व निवास कदम यांनी केले.
क्रीडा संकुलात गैरसोयी – राजेंद्र पवार
महाराष्ट्र ग्राहकचे अध्यक्ष प्रा. पी. डी. कुलकर्णी म्हणाले, शहरातील तुंबलेले सांडपाणी, वाढलेले गवत व उखडलेले रस्ते यामुळे दुर्गंधी व डेंगीचे प्रमाण खूप वाढल्यामुळे भाग्योदयनगरमधील लोक प्रचंड वैतागलेले आहेत. तालुक्याच्या सुदैवाने शहरात भव्य क्रीडा संकुल मिळाले आहे. पण येथे अनेक गैरसोयी असून त्याची खूप दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जागा असूनही खेळांचे आयोजन करता येत नाही, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.





