Satara : उन्हामुळे जनावरांनाही दुपारी अघोषित संचारबंदी

पुसेगाव : पंधरा दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यामुळे माणसांबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र बुध (ता. खटाव) परिसरात सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
यंदा मार्च महिन्यातच सूर्यनारायणाने आपला रूद्रावतार दाखवायला सुरु केले. एप्रिल महिना उजाडताच सूर्यनारायण अक्षरशः कोपत आहेत, असे म्हणण्यासारखी स्थिती झाली. उन्हाच्या प्रखरतेसोबतच पाचवीला पुजलेली पाणी टंचाईही जाणवण्यास सुरूवात झाली आहे. पाणी टंचाई आणि प्रखरतेने तापणाऱ्या उन्हामुळे शेतशिवार ओस पडू लागली आहेत. पानगळ झाल्यामुळे झाडेही नावालाच उभी असून सावलीही दुरापस्त झाली आहे.
निसर्गाच्या रूद्रावतारामुळे कूलर, एसी, पंखा याद्वारे गारवा घेण्याचा प्रयत्न माणस करतो. परंतु, पशु- पक्षी जनावरांना काहीही असले तरी निसर्गाशिवाय पर्याय राहत नाही. ही जनावरे आता रानोमाळ मिळेल त्यात आपली भूक भागवून पाण्याचा आणि सावलीचा शोध घेत आहेत.
गुरांसाठी रानावनातील चारा संपल्याने रखरखत्या उन्हात भटकंती करण्यापेक्षा सावलीत विसाव्यासाठी गुराखी धाव घेत आहेत. सध्या झाडाशिवाय कुठेही सावली सापडत नाही. दुपारचे बारा वाजले की जनावरे हिरव्या झाडांकडे धाव घेऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत विसावा घेतात. उन्हाची दाहकता आता पोटाच्या दाहकतेपेक्षा जड वाटत आहे.





