मांढरदेव : मांढरदेव, ता. वाई येथील मांढरदेवी अथलेटिक्स फाउंडेशन च्या खेळाडूंच्या माध्यमातून मांढरदेव डोंगर पठारावर वृक्ष संवर्धनाचे काम चालू आहे. येथील मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना अॅथलेटिक्स प्रशिक्षण देण्याचे काम राष्ट्रीय प्रशिक्षक राजगुरू कोचळे आणि धोंडीराम वाडकर गेली कित्येक वर्ष करत आहे. प्रशिक्षणाबरोबरच डोंगर पठारावर वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम सुद्धा कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये डोंगर पठारावर अनेक वृक्षांची लागवड खेळाडूंच्या माध्यमातून करण्यात आली होती. पावसाळ्यानंतर या डोंगर पठारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. जानेवारीत होणाऱ्या यात्रेनंतर या परिसरात काही समाजविघातक लोकांकडून वणवा लावला जातो. त्यामुळे जून, जुलैमध्ये लावलेली छोटी झाडे जळून खाक होतातव मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होते. त्यामुळे या झाडांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे काळाची गरज आहे. पावसाळ्यात लावलेल्या झाडांचे वनव्यापासून संरक्षण व्हावे म्हणून खेळाडूंनी झाडांच्या भोवतीचे गवत विळा, खुरपे व ग्रास कटरच्या साह्याने कापून घेतले. झाडाभोवती संरक्षण आळे तयार करून त्यांना पाणी देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे काम खेळाडू करत असतात. त्यांच्या या कामाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.