प्रभात वृत्तसेवा गोंदवले – मोधळ ओढ्यावरील पुलाचे व रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याने गोंदवले-दहिवडी रस्त्यावरील वाहतूक मंगळवार दि.१२ जानेवारीपासून ३१ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिले आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहिवडी रस्त्यावरील मोधळ ओढ्यावरील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.या पुलाच्या दुतर्फा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.या रहदारीच्या रस्त्याच्या कामात वाहतुकीचा व्यत्यय टाळण्यासाठी मंगळवार दि १२जानेवारी पासून ३१जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात गोंदवल्याकडून दहिवडीकडे जाण्यासाठी आप्पा महाराज चौकापासून वाहतूक वळवण्यात आली आहे.लातूर सातारा महामार्गावरून खांडसरी चौक मार्गे ही वाहतूक दहिवडीकडे वळवण्यात आली आहे. तसेच दहिवडी कडून गोंदवल्याकडे येणारी वाहतूक मायणी चौकातून खांडसरी चौकातून सातारा-लातूर महामार्गावर वळविण्यात आली आहे. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.त्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी मार्गावर तैनात राहणार असून आवश्यक तेथे वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.