Satara : अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच एकीव धबधब्याला पर्यटकांची गर्दी
Updated On:

केळघर : एकीव, ता. जावळी येथील प्रसिद्ध असलेला धबधबा यंदा अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच प्रवाहित झाल्यामुळे हौशी पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जावली तालुक्यात चहूबाजूला पाणीच पाणी झाले असून या पावसामुळे शेती जलमय झाली आहे. याशिवाय या पावसामुळे परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. जुलै महिन्याच्या दरम्यान सुरू होणारे धबधबे यंदा अवकाळी पावसामुळे चक्क मे महिन्यातच सुरू झाले आहेत.
जावळीतील प्रसिद्ध असलेला एकीव धबधबा सुद्धा पावसामुळे चांगला प्रवाहित झाला असून हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. मे महिन्याच्या सुट्टीमुळे मुंबईकर मंडळी गावी असल्यामुळे त्यांना सुद्धा या धबधब्याचा आनंद मे महिन्याच्या सुट्टीतच घेता येत आहे.





