Satara : जमीन वाटप झाले तर कोयनेत आंदोलन होणार नाही – डॉ. भारत पाटणकर

कोयनानगर (प्रतिनिधी) – कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप करा. आंदोलन होणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
कोयना काठावर 19 जूनपासून कोयना धरणग्रस्त सामूहिक आंदोलन करत असून कोयनापुत्रांचे हे आंदोलन म्हणजे साडेसहा दशकापासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबतच्या वेदना आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ” अजूनही १,५०० पेक्षा जास्त कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणे शिल्लक आहेत. कोयनेच्या प्रश्नावर ५ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन सर्व आवश्यक निर्णय मान्य करून घेतले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. या निर्णयांना अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक होणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळच नसल्याने जमीन पसंत करून ५ महिने झाले तरी वाटपाचे आदेश नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनेचा हा प्रश्न सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन आठवड्यांत बैठक घेण्याचे जाहीर करून सुध्दा बैठक घेतली नसल्याने कोयना धरणग्रस्त आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी कोयनाकाठावर आंदोलन करत आहेत.” शासनाने 19 जूनपूर्वी कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपाची कार्यवाही करावी, कोयना धरणग्रस्त आंदोलन करणार नसल्याचा विश्वास डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला.
डॉ. पाटणकर म्हणाले की 65 वर्षांपासून कोयना धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन रखडले आहे.त्र उरलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन 30 वर्ष रखडले आहे.शासनाने एका बाजूने पर्यायी जमीन दियाची आणि कब्जेहक्काची रक्कम वसूल करण्याच्या नावाखाली धरणग्रस्तांना ती जमीन विकावी लागण्याची वेळ असे आदेश शासनाने काढून धरणग्रस्तांना संकटात टाकले आहे.हा आदेश मागे घेवून कोयना धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन हा विषय सोडविण्यासाठी हा संघर्ष सुरू केला असल्याचे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.
डॉ.पाटणकर पुढे म्हणाले,ज्याला फोड त्यालाच ठणका या म्हणीप्रमाणे कोयना धरणग्रस्तांनी ५ महिन्यांपूर्वी जमीन पसंद केल्या आहेत.जमीन पसंदीचा कार्यक्रम उच्चाधिकार समितीच्या बैठका सुरू होण्यापूर्वी झाल्या आहेत.३०० पेक्षा जादा पसंदी दिल्या असल्या तरी जमीन वाटप करण्याचे आदेश नसल्याने सगळे ठप्प आहे.65 वर्षांपासूनच्या कोयना धरणग्रस्तांच्या वेदना कोयनामाईला सांगण्यासाठी कोयनापुत्र नदीपात्रात जात आहेत.पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या वेदना कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
धरणग्रस्तांच्या वेदना समजून घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या आंदोलनाला भेट दियावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे. यावेळी महेश शेलार,सचिन कदम,राम कदम, विनायक शेलार,बाजीराव लाड ,श्रीपती माने ,पांडूरंग लाड आदी उपस्थित होते.





