Satara : जिल्ह्यात होणार 5286 विशेष कार्यकारी अधिकारी

सातारा : जिल्ह्यामध्ये 5286 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी पत्रकाद्वारे दिली. यामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात 500 मतदारांमागे एक कार्यकारी अधिकारी राहणार असून राज्यात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात 5286 कार्यकारी अधिकारी नेमले जातील. या अधिकाऱ्यांची निवड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबतचा अध्यादेश काढून 500 मतदारांमागे एक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड होणार आहे.
या पदावर नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण, वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असा निकष ठेवण्यात आला आहे. शासकीय योजनांची प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या कार्यकारी अधिकाऱ्यांना असणार आहे. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतील असे या पत्रकात नमूद आहे. महिला वर्गाला या निवडीमध्ये 33 टक्के नियुक्ती दिली जाणार आहे.
या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षाचा आहे. ज्यांना विशेष कार्यकारी अधिकारी व्हायचे आहे त्यांनी भाजपचे शंभर सभासद करणे आवश्यक आहे. या सक्रिय नोंदणीकडे सर्वांनी लक्ष देण्याचे आवाहन धैर्यशील कदम यांनी केले आहे.





