Satara : तरुण पिढीने वाचनाची कास धरुन मन समृद्ध करावे

सातारा : ‘वाचाल तर वाचाल’ म्हणूनच विशेषतः तरुण पिढीने वाचनाची कास धरावी व नवनवीन पुस्तकाचे वाचन करून आपले मन समृद्ध करावे, असे आवाहन जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी केले.
परळी (ता. सातारा) नजीकच्या यादववाडी, बनघर आणि खडगाव ग्रामपंचायतींना जनवाचक चळवळीतर्फे पुस्तके प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यादववाडीच्या सरपंच सौ. हेमलता सुतार होत्या. पुस्तके वाचनाने आपले ज्ञान वाढण्याबरोबरच आत्मविश्वास वाढतो. जनवाचक चळवळीसाठी मुंबई- पुण्याहून लोक पुस्तक पाठवत आहेत ही आशादायक गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी हायस्कूलचे नारायणराव पंडित तिन्ही गावांमध्ये उपस्थित होते. या उपक्रमाचा फायदा घेण्याचे आवाहन करुन त्यांनी या योजनेचा प्रसार करण्याचे आश्वासन दिले. यादववाडी येथील शिक्षक हेमंत इंगळे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यादववाडी ग्रामपंचायतच सदस्य संजय लोहार, श्याम देवरे, विकास पवार, विश्वास वाघ, भिकू यादव, ग्रामस्थ उपस्थित होते.
बनघर येथे सरपंच विशाल राजेंद्र गुजर यांनी ही चळवळ गावामध्ये वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बनघरच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य किसन मारुती किर्दत आणि रमेश गंगाराम गुजर तसेच हनुमंत राणू गुजर उपस्थित होते. खडगाव येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. मनीषा विजय शिरटावले होत्या. वाचनाने विद्यार्थ्यांच्या निरीक्षणात तसेच ज्ञानातही वाढ होईल, असे सांगून त्यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच सौ. पुष्पा रवींद्र शिरटावले, विजय रामचंद्र शिरटावले तसेच शिक्षक केशव गणपती अलट उपस्थित होते. या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये प्रारंभिक वर्ग वाचनालय सुरू करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही श्रीराम नानल व नारायण पंडित यांनी दिली. त्यासाठी मदत करण्याची भूमिका हेमंत इंगळे व केशव अलट यांनी व्यक्त केली.





