Satara : अध्यक्षांनी ‘सह्याद्रि’ कर्जाच्या गर्तेत घातला

कराड : तीन वर्षानंतरही ‘सह्याद्रि’चे विस्तारीकरण पूर्ण झालेले नाही. आम्ही खटाव- माण साखर कारखान्याच्या पायाभरणीपासून 11 व्या महिन्यांत साखरेचे उत्पादन घेतले होते. इतर साखर कारखान्यांचे विस्तारीकरण अडीशे कोटींमध्ये तेही एक वर्षात झाले. मात्र, ‘सह्यादि’च्या विस्तारीकरणासाठी 418 कोटी रुपयांचा खर्च प्राथमिक दिसत असला तरी ते साडेपाचशे ते सहाशे कोटींपर्यंत खर्च गेला असून कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांनी ‘सह्याद्रि’ला कर्जाच्या गर्तेत घातल्याचा आरोप आ. मनोज घोरपडे यांनी केला.
सह्याद्रि साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी आ. मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करून शेतकरी, सभासदांना चांगला दर देण्यासाठी नवीन संचालक काम करतील, असे सांगून आ. घोरपडे म्हणाले, ‘‘सह्याद्रि कारखान्यात चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. कारखाना सभासदांचा राहिला नसून तो पिता- पुत्रांच्या मालकीचा झाला आहे.’’ कारखान्यातील एकाधिकारशाहीविरोधात शेतकरी, सभासदांमध्ये प्रचंड रोष असून या निवडणुकीत शेतकरी, सभासदच परिवर्तन घडवून विद्यमान अध्यक्षांना घरी बसवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीसाठी प्रथमच विरोधकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असावेत. कारखान्याचा भावी चेअरमन सर्वसामान्य शेतकर्यांमधून निवडण्याचा संकल्प सभासदांनी केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आपली काय कमराबंद चर्चा झाली? या प्रश्नावर आ. घोरपडे म्हणाले, ‘‘सह्याद्रि कारखान्याची निवडणूक काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप अशा सर्वांनी एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांना घरी बसविण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते असून त्यांना मानणारे सभासद अधिक आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली.’’ विधानसभा निवडणुकीप्रमाणेच कारखान्याच्या निवडणुकीतही एकास एक लढत देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपणास काय शब्द दिला? या प्रश्नावर ‘सह्याद्रि’चा निकाल लागेल. त्यावेळी ते सर्वांच्या लक्षात येईल,’ असे सूचक वक्तव्य आ. घोरपडे यांनी केले.
मंगळवार अखेर ९४ अर्ज दाखल
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 91 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जामध्ये एक नंबर गटात 7, दोन नंबर गटात 9, तीन नंबर गटात 8, चार नंबर गटात 21, पाच नंबर गटात आज 13 आणि आजअखेर 14, सहा नंबर गटात 18, महिला गटात 5, राखीव गटात 12 असे 91 उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. आजपर्यंत 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.





