Satara : सुडबुध्दीचे राजकारण कधीच केले नाही

यशवंतनगर : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन युनिटचा बॉयलर प्रदीपन सोहळा शुक्रवार दि. ७ रोजी होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. आजपर्यंतच्या ५० वर्षाच्या यशस्वी वाटचालीत कारखाना व्यवस्थापनाने कधीही सुडबुध्दीने, राजकीय आकसापोटी कुणालाही सभासदत्वापासून वंचित ठेवलेले नाही व यापुढेही ठेवणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कारखाना कार्यस्थळावरील पत्रकार परिषदेत श्री. पाटील म्हणाले, ‘‘ कारखाना प्रशासनाने शेअर्सची अपूर्ण रक्कम कारखान्याकडे भरणा करण्यासाठी २६६४ सभासदांना पत्राने कळविले होते. त्याप्रमाणे एकूण ४४३ सभासदांनी शेअर्सची अपूर्ण रक्कम भरली आहे. त्यांचा समावेश प्रारुप मतदारयादीमध्ये करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रातील मार्गदर्शनाप्रमाणे कारखान्याच्या एकूण ३०१३० पात्र सभासद मतदारांची प्रारुप मतदारयादी सादर केली.
त्यासोबत शेअर्सची रक्कम अपूर्ण असलेल्या एकूण २२२१ आणि मृत ३९२० सभासदांच्या स्वतंत्र याद्या सादर केल्या आहेत.’’ चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी शेअर्सधारकांना भागाची अपूर्ण रक्कम कारखान्याकडे दि. २७ जानेवारीपूर्वी भरणा करावी, असे आवाहन दि. २३ जानेवारी रोजी केले. त्याप्रमाणे २२२१ पैकी ५६७ सभासदांनी अपूर्ण शेअर्सची रक्कम कारखान्याकडे भरणा केली व त्यांच्या नावांचा प्रारुप मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली. अपेक्षेप्रमाणे त्यास मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
उच्चांकी दराची परंपरा…
कारखान्याने आजपर्यंत उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली आहे. दिलेल्या ऊस दराची रक्कम वेळेत (सोसायटी कर्ज, पाणीपट्टी, शासकीय पाणीपट्टी वजा जाता) बँक खात्यावर वेळेत वर्ग केली आहे. तसेच कारखान्याचे वजन काटे अचूक आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनांबाबत सभासदांची कसलीही तक्रार नाही. जे कारखान्यास ऊस देत नाहीत, सभासद नाहीत, ज्यांचा कारखान्यांशी कसलाही संबंध नाही असेच लोक कारखान्याबाबत चुकीच्या अफवा (फेक नरेटिव्ह) पसरवित आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
निवडणूक प्राधिकरणाने सह्याद्री कारखान्याला दिलेल्या पत्रात पूर्ण शेअर्स रक्कम असलेले सभासद, अपूर्ण शेअर्स रक्कम असलेले सभासद व मृत सभासद अशा याद्या सादर करण्यास सांगितले. त्या पध्दतीने आम्ही निवडणूक प्राधिकरणाला याद्या पाठवल्या. यामध्ये कोणाला जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्याचा हेतू नव्हता. मतदान हा प्रत्येक सभासदाचा हक्क आहे. तो त्यांना मिळायलाच हवा अशी आमची भूमिका आहे. आम्ही कधीच सुडबुध्दीचे राजकारण केले नाही.
– बाळासाहेब पाटील (चेअरमन, सह्याद्रि साखर कारखाना)





