Satara : वंचितांच्या, पीडितांच्या अडचणी सोडवण्यास पक्ष मजबूत करणार

कुडाळ : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक संजय (भैय्या) सोनवणे यांच्या आदेशाने पक्षाचे काम महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे. नेत्यांनी आजपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा वापर केला. परंतु, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात असे होत नाही. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, घडला पाहिजे याच उद्देशाने या पक्षाची वाटचाल सुरू आहे. तसेच वंचितांच्या, पीडितांच्या अडीअडचणी सोडवणे हा या पक्षाचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा पक्ष मजबूत करणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी व्यक्त केला.
श्री. किरण बगाडे यांच्या उपस्थितीत तसेच युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहात बैठक झाली. जिल्ह्यातील पक्षविस्तारासाठी गावागावांत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षबांधणी करुन सर्व पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन तरुण चेहऱ्यांना संधी देणार आहे. जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम मजबूत करण्यासाठी वंचित, पीडित, शोषित कामगारांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तयारी करत आहे, असे त्यांनी सांगितले.
विविध पक्षांत कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम आग्रही राहणार असल्याचे सोमनाथ धोत्रे यांनी सांगितले. सर्व तालुक्यांतील महिला, युवक, कामगार पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याचे किरण बगाडे यांनी सांगितले. यावेळी ॲड. नलावडे, अनिल उमापे यांनी पक्ष बांधणीबाबत मते व्यक्त केली.
यावेळी संतोष भिसे, मंगेश गायकवाड, प्रणित मोरे, सयाजी भिसे, विजय सातपुते, श्रीकांत शिंदे, किरण जाधव, सुनील कदम, रणवीर परदेशी, सूरज भिसे, अरविंद घाडगे, शौकत कुरेशी, अजय अवताडे, राकेश खरात, योगेश माने (पैलवान), कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





