सातारा । भुयाचीवाडीतील बंधारा पुन्हा बांधण्यात येईल

पुसेसावळी – कृष्णा नदीवर भुयाचीवाडी, ता. कराड येथे बांधण्यात आलेला बंधारा पावसाने नुकताच वाहून गेला. या बंधार्याची पाहणी वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी केली. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून, हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी कराड बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, नवीन कवठेचे सरपंच गणेश घार्गे, दीपाली खोत, नवीन जगदाळे, नीतिराज जाधव, नीलेश जाधव, संजय जाधव, प्रवीण जाधव, विठ्ठल साळुंखे, विशाल यादव उपस्थित होते.
राजेंद्र चव्हाण म्हणाले, बंधारा वाहून गेल्याने नवीन कवठे, खराडे, कालगाव, भुयाचीवाडी या गावांमधील शेतकर्यांना आपापल्या शेतांमध्ये जाताना त्रास होत आहे. भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. बंधार्याशी संबंधित माहिती घेऊन धैर्यशील कदम यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली आहे. या बंधार्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना कदम यांनी दिल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात हे काम मार्गी लागणार आहे. या बंधार्यासाठी भविष्यातदेखील निधीची तरतूद करण्याची ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली आहे.





