प्रभात वृत्तसेवा सातारा – यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (दि.२३) सातारा शहरातील ३१ केंद्रांवर पार पडणार आहे. नवीन शिक्षक व कार्यरत शिक्षकांसाठी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत केंद्रातील प्रत्येक वर्गात बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षापर्यंत तत्काळ अलर्ट पाठवला जाणार आहे. विद्यार्थी संशयास्पद हालचाल करत असल्यास, मागे वळत असल्यास किंवा संकेत देत असल्यासही हॉटलाइन थेट वाजणार असून केंद्र संचालकांनाही सूचना पोहोचणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ११ हजार ९७१ परीक्षार्थींनी नोंदणी केली असून कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ही परीक्षा होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने उच्चस्तरीय यंत्रणा सज्ज केली आहे. केंद्र संचालकांच्या केबिनमध्ये तीनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र दिसल्यास किंवा अचानक कोणाचीही एंट्री झाल्यास एआय कॅमेरे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित संदेश पाठवतील. जिल्हा संनियंत्रण कक्षातून या सर्व हालचालींचे लाइव्ह निरीक्षण करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्निशन आणि अंगठ्याचे बायोमेट्रिक तपासणी होणार आहे. चेहरा किमान ५० टक्के जुळणे बंधनकारक आहे. अन्यथा परीक्षेला बसण्यास मनाई होणार आहे. सकाळी साडेदहाला पहिला पेपर सुरू होणार असून परीक्षार्थ्यांनी एक तास आधी केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. दुसरा पेपर दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहे. पहिल्या पेपरासाठी ४ हजार ९४५ तर दुसऱ्या पेपरसाठी ७ हजार २६ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत परीक्षेच्या नियोजनाची बैठक झाली आहे. उमेदवाराने अर्जात अपलाेड करण्यात आलेला फोटो परीक्षेच्या दिवशी डिजीटल पध्दतीने त्याच्या चेहऱ्याशी जुळवला जाणार आहे. प्रवेशावेळी उमेदवाराचा चेहरा स्कॅन करुन सिस्टिम या फोटोशी मॅच करेल. परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.पहिली ते आठवीसाठी शिक्षकांनी ५२ वर्षांपर्यंत टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्यानंतर अर्जसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा अर्ज वाढले असून, अधिक विद्यार्थ्यांचा ताण सांभाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर अतिरिक्त समवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात २४ विद्यार्थी असणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ते असणार आहेत. राज्य परीक्षा परिषद उपग्रह फोन, हॉटलाइन आणि व्हॉइस अलर्टद्वारे सातत्याने संपर्कात राहणार आहे. सर्व संशयास्पद हालचालींची नोंद रिअलटाइम घेतली जाईल आणि गरज पडल्यास तातडीने कारवाईही केली जाणार असल्याची माहिती श्री. नायकवडी यांनी दिली. “यंदाची टीईटी पूर्णतः पारदर्शक आणि शंकाविरहित पार पाडण्यावर आमचा कटाक्ष आहे. परीक्षा परिषदेच्या सुचनांनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एआय आधारित उपग्रह हॉटलाइन, सीसीटीव्ही आणि अतिरिक्त समवेक्षकांची नेमणूक यामुळे कोणत्याही गैरप्रकाराला जागा राहणार नाही.” -अनिस नायकवडी, प्राथमिक शिक्षणाधिकारी