Satara : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत कोण हा सोलापूरकर असे विचारत छत्रपतींविषयी विकृत विधाने करणाऱ्या लोकांवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
दिल्ली येथे दौऱ्यावर असणाऱ्या खासदार उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उदनराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी कधीही स्वार्थ पाहिला नाही, सर्व जातीधर्माच्या लोकांना आपले कुटुंब मानलं आणि तत्वाशी तडजोड केली नाही. असे असताना हा राहुल सोलापूरकर कोण आहे, अशा लोकांना लाचेपलीकडे काही समजत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल.
जनतेने अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.’’ विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांनी थारा देता कामा नये. मला वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, या भाषेत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला. सोलापूरकर यांच्या विधानावर महाराष्ट्रावर संतापाची लाट उसळली आहे.
विविध हिंदुत्ववादी संघटनांनी व राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. निषेध मोर्चे काढण्यात आले. एका पॉडकास्टमध्ये राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याचा देशपातळीवर निषेध व्यक्त होत आहे.





